पुणे महाराष्ट्र: महाराष्ट्र आयर्नमॅन टीम अंतिम फेरीत

पुणे महाराष्ट्र: महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने प्रीमिअर हँडबॉल लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने शनिवारी यजमान राजस्थान पॅट्रीओट्सवर ३८-२८ अशा दणदणीत विजयाची नोंद केली. महाराष्ट्र आयर्नमॅनचा गोलरक्षक नवीन देश्वालने आज २२ गोल्स वाचवले, तर कर्णधार इगोर चिसेलिओव्हने सर्वाधिक १० गोल्स केले आणि ६ गोल्ससाठी सहाय्य केले. दुसऱ्या हाफमध्ये महाराष्ट्र आयर्नमॅनने २१ गोल्स करताना सामन्याचा एकतर्फी निकाल लावला.

प्रीमिअर हँटबॉल लीगची पहिली उपांत्य फेरी कमालीची चुरशीची

झाली. दोन्ही संघांकडून तोडीस तोड झालेला पाहायला मिळाला. साखळी फेरीत आयर्नमॅनला पराभूत करणारा एकमेव संघ असलेल्या राजस्थानने सुरुवात दणक्यात केली होती. अभिनेता शरद केळकर यांनी आजच्या सामन्याचा आनंद लुटला, ते राजस्थान पॅट्रीओट्सला सपोर्ट करताना दिसले. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड आयर्नमॅनने केली. इगोल चिसेलिओव्ह, जलाल कियानी, मनजित कुमार, अंकित आणि सुमित घंघास हे तगडे खेळाडू आयर्नमॅनने सुरुवातीपासूनच मैदानावर उतरवले होते. त्यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ करताना आयर्नमॅनला आघाडी मिळवून दिली. नवीन देश्वालने सुरुवातीला अप्रतिम बचाव करताना आयर्नमॅनची आघाडी कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली.

अर्जुन लाक्रा, दीमित्री किरीव्हा आमि हरदेव सिंग हे फॉर्मात असलेले खेळाडू गोल करण्यात सातत्य राखू शकले नाही आणि त्याचा फटका राजस्थानला बसला. कर्णधार चिसेलिओव्ह आणि घंघास यांच्या आक्रमणाला आज तोड नव्हती. देश्वाल मजबूत भिंत उभी करून राजस्थानचे आक्रमण सहज परतवून लावत होता. पहिल्या १५ मिनिटांत आयर्नमॅनने १०-७ अशी आघाडी घेतली. राजस्थानच्या रॉबिन सिंगला रेड कार्ड दाखवून बाहेर केले गेले. त्याने मोहित पुनियावर फाऊल केला. पॅट्रीओट्सने सामन्यात आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते आणि हॅप्पी सिंगने त्यांना यश मिळवून दिले. त्याला अमनिंदर सिंग आणि अर्जुन लाक्राची साथ मिळाली अन् त्यांनी सातत्याने गोल करण्यास सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये कमालीची उत्कंठा पाहायला मिळाली आणि चिसेलिओव्ह, घंघास, अंकित व जलाल यांनी आयर्नमॅनची आघाडी

१७-१४ अशी कायम राखली.

दुसऱ्या हाफमध्ये राजस्थान पॅट्रीओस्टने चांगला खेळ करताना सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. अमनिंदर सिंगने चांगला केळ केला. त्यामुळे दुसऱ्या हाफच्या मध्यांतरापर्यंत सामना २७-२२ असा चुरशीचा झाला. अमनिंदर आणि लाक्रा यांनी सर्वोत्तम प्रयत्न करताना पॅट्रीओट्सना सामन्यात कायम राखले होते, परंतु त्यांना अन्य सहकाऱ्यांची अपेक्षित साथ मिळाली नाही. दुसरीकडे आयर्नमॅनच्या जलाल व मनजित यांनी मोक्याच्या क्षणी अप्रतिम गोल करून आयर्नमॅनची आघाडी वाढवली.

चिसेलिओव्ह सुरुवातीची काही मिनिटे सावध खेळ करताना दिसला, परंतु हळुहळू त्याने राजस्थानचा बचाव भेदण्यास सुरुवात केली. त्यामुळे राजस्थानचे खेळाडू गोंधळलेले दिसले. शेवटच्या १० मिनिटांत आयर्नमॅनने आक्रमण अधिक तीव्र केले. कियानी, चिसेलिओव्ह, अंकित आणि मनजित यांना रोखणे राजस्थानला अवघड होऊन बसले होते. आयर्नमॅनने ३८-२८ अशी मजबूत आघाडी घेतली आणि प्रीमिअर हँडबॉल लीगच्या अंतिम फेरीत धडक दिली. दुसऱ्या उपांत्य फेरीत तेलुगू टॅलोन्स विरुद्ध गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश असा सामना होणार आहे.

Close Help dada